Odisha Train Accident: “या दुर्घटनेमागे कट असावा, कारण विचित्र वेळी…”, माजी रेल्वेमंत्र्यांचं खळबळजनक विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Odisha Train Accident: ओदिशाच्या (Odisha) बालासोर जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातानंतर देशात खळबळ माजली आहे. शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Shalimar Express), बंगळुरु हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (Yesvantpur-Howrah Superfast) आणि मालगाडी यांच्यात धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातात 260 हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून तब्बल 900 जण जखमी झाले आहेत. यादरम्यान, माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी या दुर्घटनेमागे कट असू शकतो अशी शक्यता वर्तवली आहे. तसंच या संपूर्ण दुर्घटनेची अत्यंत गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. या अपघाताची वेळ विचित्र असल्याचं ते म्हणाले आहेत. माजी रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं आहे की “या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि याचं विश्लेषण झालं पाहिजे. ही एक भीषण दुर्घटना आहे”.

माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी म्हणाले आहेत की “मी जे दृश्य पाहत आहे ते पाहिल्यानंतर जणू काही भूकंप आला आहे असं वाटत आहे. जापानप्रमाणे एकही मृत्यू न होणं हे आपलं लक्ष्य असलं पाहिजे. नवं तंत्रज्ञान येत असून रेल्वेच्या यंत्रणेतही ते समाविष्ट केलं जात आहे”.

“पश्चिम बंगालमध्ये 2010 रोजी एक मोठा रेल्वे अपघात झाला होता. यानंतर तब्बल 10 वर्षं तिथे ट्रेन धावली नाही. या दुर्घटनेत गीतांजली एक्स्प्रेस एका मालगाडीवर चढली होती. या दुर्घटनेत 150 ते 180 लोकांचा मृत्यू झाला होता. 2010 मध्ये चौकशी आयोगाने ही घटना मोठी शोकांतिका असल्याचे म्हटलं होतं”, अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

59 वर्षांपूर्वीचा ‘ती’ भीषण दुर्घटना! जेव्हा संपूर्ण ट्रेनच समुद्रात बुडाली, अख्खं स्टेशनच झालं होतं गायब; अंगावर शहारा आणणारी घटना

 

ओडिशामधील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 261 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर लष्कर, हवाई दलासह अनेक पथकं बचावकार्यात सहभागी आहेत. ट्रेनच्या डब्यांमध्ये अनेक प्रवासी अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. ट्रेनच्या डब्यांत खाण्या, पिण्याचे पदार्थ, पाण्याच्या बाटल्या, चपला विखुरले आहेत. 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दुर्घटनेनंतर शनिवारी एक दिवसासाठी राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. 

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. बचावकार्यात हवाई दल आणि लष्करासह एनडीएआरएफचं पथकही दाखल आहे. ओडिशा सरकारने स्पेशल रेस्क्यू ऑपरेशन टीमलाही बचावकार्यात सहभागी करुन घेतलं आहे. 

दुर्घटनेनंतर जखमींसाठी 60 हून अधिक रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. मुख्यत्वे चार रुग्णालयांमध्ये उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. दुर्घटनेत जखमी झालेले अनेक लोक बंगालमधील आहेत. 

Related posts