( प्रगत भारत । pragatbharat.com)
Odisha Train Accident : ओडिशा (Odisha News) तिहेरी रेल्वे अपघातानंतर संपूर्ण देशाला हादरवलं आहे. दोन प्रवासी रेल्वे गाड्या आणि एक मालगाडी यांच्या धडकेत शेकडो प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर हजारो जण या अपघातात जखमी झाले आहेत. या अपघातानंतर बालासोरच्या एका शाळेमध्ये मृतांचा खच पडला होता. त्यानंतर हे मृतदेह विविध रुग्णालयात नेण्यात आले. या भीषण अपघातामुळे या रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. दुसरीकडे या अपघातातील मृतांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मृतदेहांच्या मोजणीत काही चूक झाली असल्याची माहिती ओडिशाच्या मुख्य सचिवांनी दिली आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येबाबत रेल्वे विभाग आणि राज्य सरकारमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर एकाच मृतदेहाची दोनदा मोजणी झाल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना ही माहिती दिली आहे.
“शनिवारी, रेल्वे प्रशासनाने सांगितलेली मृतांची संख्या 288 होती. काल रात्री जिल्हाधिकारी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने प्रत्येक मृतदेहांची तपासणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी डेटा तपासला असता असे आढळले आहे की काही मृतदेह दोनदा मोजले गेले आहेत त्यामुळे मृतांची संख्या 288 झाली. मात्र या अपघातात 275 जणांचा मृत्यू झाला आहे,” अशी माहिती ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिली. 1,175 जखमींपैकी 793 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, असेही प्रदीप जेना म्हणाले.
#WATCH कल रेलवे ने साझा किया था कि मरने वालों की संख्या 288 हो चुकी है। कल रात DM और उनकी पूरी टीम ने एक-एक शव की जांच की। DM द्वारा डेटा की जांच की गई और पाया गया कि कुछ शवों की दो बार गिनती की गई है, इसलिए मरने वालों की संख्या को संशोधित कर 275 कर दिया गया है: ओडिशा के मुख्य… pic.twitter.com/e7lKwaLrrv
— ANI_HindiNews (@AHindinews) June 4, 2023
दुसरीकडे, दिल्लीत रेल्वे बोर्ड ऑपरेशन आणि बिझनेस डेव्हलपमेंटच्या सदस्या जया वर्मा सिन्हा यांनी सांगितले की, “प्राथमिक निष्कर्षांनुसार, सिग्नलिंगमध्ये काही समस्या आहेत. आम्ही अद्याप तपशीलवार अहवालाची वाट पाहत आहोत. फक्त कोरोमंडल एक्सप्रेसला अपघात झाला. ट्रेन सुमारे 128 किमी/तास वेगाने धावत होती.” “मालगाडी रुळावरून घसरली नाही. मालगाडी लोहखनिज घेऊन जात असल्याने कोरोमंडल एक्स्प्रेसचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. यामुळेच मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसच्या रुळावरून उतरलेल्या बोगीची यशवंतपूर एक्स्प्रेसच्या शेवटच्या दोन बोगींशी धडक झाली. कोरोमंडल एक्स्प्रेसच्या रुळावरून घसरलेल्या बोगी डाउनलाइनवर आल्या आणि 126 किमी/तास वेगाने डाउनलाइनवरून जात असलेल्या यशवंतपूर एक्स्प्रेसच्या शेवटच्या दोन बोगींवर आदळल्या,” असेही जया वर्मा सिन्हा म्हणाल्या.
दरम्यान, बालासोर येथे शुक्रवारी झालेल्या रेल्वे अपघातानंतर अपघातस्थळी खराब झालेले डबे हटवणे आणि रुळ दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी ट्विट करून माहिती दिली की, डाउन मेन लाइन रविवारी पूर्ववत करण्यात आली आहे. तर जया वर्मा सिन्हा यांनी सांगितले की, “बालासोर ट्रेन अपघात स्थळी ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. संध्याकाळपर्यंत दोन मार्ग पूर्ववत होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी 8 च्या सुमारास, आम्हाला 2 लाईन्स मिळतील, ज्यावर ट्रेन हळू चालण्यास सुरवात करतील. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.”