साऊथ सुपरस्टार विजयकांत यांचे निधन; कोविड पॉझिटिव्ह असल्याने सुरु होते उपचार

( प्रगत भारत । pragatbharat.com)

DMDK founder Vijayakanth passes away : साऊथ सुपरस्टार आणि देसिया मुरपोक्कू द्रविड कळघमचे (DMDK) संस्थापक विजयकांत यांचे निधन झालं आहे. चेन्नईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्युमोनियामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. डीमडीके पक्षाने विजयकांत यांच्या निधनानंतर एक निवेदन जारी करून म्हटले आहे की त्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते.

अभिनेता-राजकारणी आणि डीमडीके प्रमुख कॅप्टन विजयकांत यांचे निधन झालं आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, त्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. त्यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विजयकांत निरोगी आहेत आणि चाचणीनंतर घरी परततील, असे पक्षातर्फे सांगण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर जारी करण्यात आलेल्या निवेदनात विजयकांत यांची कोविड -19 चाचणी सकारात्मक आली आहे आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ते व्हेंटिलेटरवर आहेत, असे पक्षाकडून सांगितले.

दुसरीकडे, विजयकांत यांना ज्या एमआयओटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते त्यांनी मेडिकल बुलेटिन जारी केले आहे. ‘कॅप्टन विजयकांत न्यूमोनियामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही, 28 डिसेंबर 2023 रोजी सकाळी त्यांचे निधन झाले आहे, असे एमआयओटी रुग्णालयाने म्हटलं आहे. 71 वर्षीय अभिनेते-राजकारणी विजयकांत यांना गेल्या काही दिवसांपासून सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांची प्रकृती खालवली होती. त्यानंतर रुग्णालयाच्या मेडिकल बुलेटिननंतर पक्षानेही विजयकांत यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

माध्यमांच्या वृत्तानुसार, 11 डिसेंबर रोजी सर्दी आणि खोकल्याच्या गंभीर लक्षणांमधून बरे झाल्यानंतर ते रुग्णालयातून घरी परतले होते. त्याचवेळी एमआयओटी हॉस्पिटलने 71 वर्षीय नेते विजयकांत यांच्या तब्येतीच्या बाबतीत एक निवेदन जारी केले होते की, विजयकांत पूर्णपणे बरे झाले आहेत आणि घरी परतले आहेत.

दरम्यान, विजयकांत यांचा चित्रपटसृष्टीचा प्रवासही कायम लक्षात राहणारा होता. विजयकांत यांनी 154 चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यातील बरेच चित्रपट हिट ठरले होते. चित्रपटांनंतर, त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी डीमडीकेची स्थापना केली आणि विरुधाचलम आणि ऋषिवंद्यम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत दोनदा विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले.

2006 च्या विधानसभा निवडणुकीत 8 टक्के मतांसह आमदार झालेल्या विजयकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केला होता. नंतर ते 2011 ते 2016 पर्यंत तामिळनाडू विधानसभेत विरोधी पक्षनेते बनले. मात्र त्यांच्या प्रकृतीमुळे पक्षाचेही नुकसान झाले होते आणि राज्यातील सत्ताही गेली. कॅप्टन विजयकांत यांची प्रकृती गेल्या काही वर्षांपासून पक्षासाठी सातत्याने चिंतेची बाब होती. गेल्या काही काळात ते राजकीय घडामोडींचा भाग नव्हते. त्यांच्या पत्नी प्रेमलता पक्षाचा कारभार पाहत होत्या.

Related posts