Confirm Ticket : कन्फर्म तिकीट असतानाही उभ्यानं प्रवास; रेल्वे प्रवासादरम्यान ‘या’ प्रवाशासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indian Railway Confirm Ticket : जगातील चौथ्या क्रमांकाचं आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं जाळं असणाऱ्या रेल्वे विभागानं आजवर प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्यानं रेल्वे प्रवास आणि रेल्वे मार्गांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. किंबहुना रेल्वे विभागाकडून क्षणाक्षणाला प्रवाशांच्या तक्रारींचा विचार करून त्या दृष्टीनंही काही बदल करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. अशा या रेल्वेनं प्रवास करण्यापूर्वी अनेकांनाच धास्ती लागून राहिलेली असते ती म्हणजे कन्फर्म तिकीटाची. (Confrimed Ticket)

तिकीट कन्फर्म असलं म्हणजे तुम्हाला रेल्वेचा प्रवास निर्धारित आसनावर बसून करता येतो. थोडक्यात प्रावसा सुकर होतो असं म्हटलं जात असलं तरीही काही प्रसंग यासाठीसुद्धा अपवाद ठरतात. विश्वास बसत नाहीये? नुकताच घडलेला एक प्रसंग छायाचित्रासहीत पाहून तुम्हाला धक्काच बसेल. कारण, रेल्वेचं कन्फर्म तिकीट असतानाही या प्रवाशाला उभ्यानं प्रवास करावा लागला आहे. 

सोशल मीडियामुळं समोर आलं वास्तव 

आभास कुमार श्रीवास्तव नावाच्या एका व्यक्तीनं X च्या माध्यमातून त्यांच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. ‘सुरुवातीला राऊरकेला इंटरसिटी ट्रेनमध्ये गर्दी इतकी होती की, सीटपर्यंत पोहोचणं शक्यत झालं नाही. अखेर जेव्हा सीटपाशी पोहोचलो तेव्हा तिथं माझ्या आरक्षित आसनावर एक गर्भवती महिला बसल्या होत्या.’ आसनावर गर्भवती महिलेला पाहून त्यांना उठवून आपल्या आसनावर बसण्याऐवजी आभास कुमार यांनी रेल्वेच्या दारापाशी उभं राहून दोन तासांचा हा प्रवास उभ्यानंच केला. 

रितसर आरक्षित तिकीट असूनही उभ्यानं प्रवास करावा लागल्यामुळं आभास कुमार नामक या प्रवाशानं भारतीय रेल्वे, आयआरसीटीसी (IRCTC) आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे उपरोधिक स्वरात आभार मानले. 

आभास कुमार श्रीवास्‍तव (केन विलियमसन फॅनक्‍लब) नावाच्या अकाऊंटवरून या प्रवाशानं लिहिलं, ‘चार दिवसांपूर्वीच तिकीट काढलं आणि ते कन्फर्मही होतं. पण, ट्रेनमध्ये चढल्यावर माझ्या लक्षात आलं की मी माझ्या आसन क्रमांक 64 पर्यंत पोहोचलोही नव्हतो. तासाभरानंतर जेव्हा मी आसनापाशी आलो तेव्हा तिथं एक गर्भवती महिला होत्या, मग दारापाशी गेलो  आणि दोन तास तिथंच राहीलो…’

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये रेल्वेच्या आरक्षित डब्यामध्ये जनरल कोचप्रमाणं झालेली गर्दी पाहून सध्या रेल्वे प्रवासाची नेमकी काय अवस्था आहे हे स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे वरील व्यक्तीसोबत घडलेला प्रसंग इतरांसोबतचही घडू शकतो, त्यामुळं आरक्षित आसनांवर बसणाऱ्या प्रवाशांबाबत रेल्वे आता काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं. 

Related posts