Railway Super App ticket Booking to Train Tracking Marathi News; रेल्वेचे सुपर अॅप, एका क्लिकवर तिकीट बुकींगपासून ट्रॅकींगपर्यंत सर्वकाही

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Railway Super App:  वेळेत आणि सुखकर आणि सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे देशात ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन रेल्वेदेखील नवनव्या सुविधा आपल्या प्रवाशांसाठी आणत असते. याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वे एका सुपर अ‍ॅपवर काम करत आहे.  जिथे एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व कामे होणार आहेत.

तुम्हाला तिकीट बुक करायचे आहे किंवा ट्रेनचे लाईव्ह लोकेशन तपासायचे असे तर अशी सर्व कामे एकाच अ‍ॅपने करता येणार आहे. रेल्वेशी संबंधित वेगवेगळ्या कामांसाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये वेगवेगळे अॅप्स ठेवण्याची गरज नाही. रेल्वे आपल्या सुपर अ‍ॅपमध्ये सर्व सेवा एकाच विंडोमध्ये आणण्याचे काम करणार आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

रेल्वे लोकांच्या सुविधा लक्षात घेऊन एक सुपर अ‍ॅप तयार करत आहे. यानंतर लोकांना त्यांच्या फोनवर वेगवेगळे अ‍ॅप डाउनलोड करण्याची गरज भासणार नाही. रेल्वेच्या या सुपर अ‍ॅपमध्ये फक्त एका क्लिकवर सर्व सेवा पूर्ण होणार आहेत. रेल्वे आपल्या सुपर अ‍ॅप अंतर्गत सर्व विविध अ‍ॅप्स आणण्याचा प्रयत्न करत आहे. 

सध्या रेल्वेकडे असे अनेक अ‍ॅप आहेत. ज्यांच्या मदतीने लोकांना विविध सुविधा मिळतात. रेल्वे प्रवासादरम्यान येणाऱ्या तक्रारी आणि सूचनांसाठी रेल्वे मदद अ‍ॅप, अनारक्षित तिकीट बुकिंगसाठी यूटीएस अ‍ॅप, ट्रेनची स्थिती जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय ट्रेन चौकशी प्रणाली, आपत्कालीन मदतीसाठी रेल मदद, तिकीट बुकिंग आणि रद्द करण्यासाठी IRCTC कनेक्ट, ट्रेनमध्ये जेवण बुक करणे  IRCTC ई-कॅटरिंग अशी अनेक अ‍ॅप आहेत. या अ‍ॅप्सच्या मदतीने तुम्हाला रेल्वेच्या विविध सेवांची माहिती आणि सुविधा मिळत असते. 

या समस्यांपासून तुम्हाला लवकरच आराम मिळेल. या सुपर अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही रेल्वेशी संबंधित सर्व सेवा एकाच अ‍ॅपमध्ये मिळवू शकणार आहात. सीआरआयएस रेल्वेचे आयटी सिस्टम युनिट हे सुपर अॅप तयार करत आहे. हे अॅप तयार करण्यासाठी सुमारे 3 वर्षे आणि 90 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. 

Related posts