leader got cold activists lit fire train compartment Indian Railway News;असे कसे कार्यकर्ते? नेत्याला थंडी लागली म्हणून रेल्वे डब्यातच पेटवली शेकोटी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Activists Lit Fire Train : अभिनेता ओंकार भोजनेची ‘मी कार्यकर्ता’ नावाची कविता खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये त्याने कार्यकर्त्या आपल्या नेत्यासाठी काय काय करु शकतो, याची सुंदर शब्दात मांडणी केली आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलात तरी हा कार्यकर्ता तुम्हाला सापडेल. जो आपल्या नेत्याची शाबासकी मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असतो. अशाच काही कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यामध्ये कार्यकर्त्यांनी रेल्वे डब्यात शेकोटी पेटवली आहे. हा प्रकार समजल्यावर तुम्हीदेखील डोक्यावर हात माराल आणि असे कसे कार्यकर्ते? असा प्रश्न नक्की विचाराल.

देशभरात सध्या थंडीचे वातावरण सुरु आहे. विशेषतः उत्तर भारतातील नागरिक कडाक्याच्या थंडीमुळे हैराण झाले आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशातील कानपूर सेंट्रल स्थानकावर रेल्वेत आगीच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली. काय घडले? म्हणून सर्वजण एकमेकांना विचारु लागले तेव्हा संतापजनक प्रकार समोर आला. 

शेतकरी संघटनेच्या नेते रेल्वेतील एसी कोचने प्रवास करत होते. आधीच थंडी त्यात एसी कोचमध्ये बसलेल्या नेत्यांना गारवा असाहय्य होत होता. यावेळी कार्यकर्त्यांनी शक्कल लढवत ट्रेनमध्ये आग पेटवल्याचा प्रकार समोर आलाय. 14164 संगम एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये शेकोटी पेटवल्याचा व्हिडीओ एकाने आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आणि रेल्वेमंत्र्यांना पाठवला आहे. यानंतर पटापट सूत्र हलली. कंट्रोल रुममध्ये माहिती पोहोचली.

व्हिडीओ व्हायरल

काही वेळातच हा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होऊ लागला. त्यानंतर रेल्वे मंत्र्यांकडून कारवाईचे आदेश देण्यात आले. इतक्यातच ट्रेन कानपूर सेंट्रल स्टेशनवर पोहोचली आणि एकच खळबळ उडाली. डेप्युटी सीटीएम, आणि जीआरपी आणि आरपीएफ पोलिस दलांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर गोळा झाले. रेल्वे पोलिसांनी ट्रेन थांबवली आणि तपासणी सुरू केली आणि माहिती समोर आली.

कार्यकर्त्यांनी पेटवली शेकोटी

किसान युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कुशल पाल आर्य आणि गौरव टिकेत हे त्यांच्या 100 ते 150 कार्यकर्त्यांसह संगम एक्सप्रेस ट्रेनच्या एसी कोचमधून प्रवास करत होते. दरम्यान, नेत्यांना थंडी जाणवू लागल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. आपल्या लाडक्या नेत्याचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी शेकोटी पेटवल्याचे चौकशीअंती समोर आले. चुकून जरी आग पसरली असती तर विचित्र घटना घडली असती,याचे भानही कार्यकर्त्यांना नव्हते. 

कार्यकर्त्यांना भरला दम

रेल्वे अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना चांगलाच दम भरला. भविष्यात असे करू नये, अशा सूचना देऊन गाडी सोडण्याची परवानगी देण्यात आली. रेल्वेमंत्र्यांच्या आदेशानुसार सीटीएम, जीआरपी आणि आरपीएफ पोलिस दलांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर ट्रेनची तपासणी सुरू केली. तपासादरम्यान आरोपीची ओळख पटू शकली नसली, तरी शेतकरी नेत्यांच्या आश्वासनानंतर रेल्वे पाठवण्यात आल्याची माहिती सीटीएम आशुतोष कुमार यांनी दिली.

Related posts