‘मला एवढं एक काम करु द्या…’, शिवराज सिंग चौहान यांची नव्या मुख्यमंत्र्यांकडे विनंती

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी मोहन यादव यांची निवड झाल्यानंतर इतकी वर्षं राज्याचं नेतृत्व करणारे शिवराज सिंह चौहान यांनी शेवटच्या पत्रकार परिषदेत आपल्या मनात कोणताही खेद नसल्याचं म्हटलं आहे. तसंच आपण दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला आहे. मात्र यावेळी त्यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे एका गोष्टीसाठी परवानगी मागितली आहे. 

मुख्यमंत्रिपदाला रामराम ठोकल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी भोपाळमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकाळातील कामकाज, उपलब्धी, पक्ष नेतृत्व, प्रशासन या सगळ्यांचा उल्लेख केला. यावेळी भावूक झालेल्या शिवराज सिंह चौहान यांनी नव्या मुख्यमंत्र्यांकडे एक विनंती केली. त्यांनी मला रोज एक झाड लावण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी मोहन यादव यांच्याकडे केली आहे. यासाठी जमीन उपलब्ध करुन द्यावी आणि त्या झाडांचं संरक्षण होत राहावं असंही ते म्हणाले आहेत. शिवराज सिंह चौहान रोज एक रोप लावतात. मग ते भोपाळमध्ये असोत किंवा दुसऱ्या शहरात असोत, हा रोज त्यांच्या दिनचर्येचा भाग असतो. 

‘मी दिल्लीत जाणार नाही’

शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी आपल्या कार्यकाळात काही चूक झाली असेल तर माफ करा असं म्हटलं. आपल्या नव्या भूमिकेबद्दल त्यांनी सांगितलं की, भाजपा म्हणजे एक मोहीम आहे. या मोहिमेअंतर्गत जी जबाबदारी दिली जाईल, ती मी निभावेन. छिंदवाडा येथून निवडणूक लढवण्याबद्दल ते म्हणाले की, “मी कोणताही निर्णय घेत नाही, पक्ष जो निर्णय घेतो तो मला मंजूर असतो”. दिल्लीत जाण्याच्या प्रश्नावर शिवराज सिंह चौहान यांनी, आपण दिल्लीत जाणार नसल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम दिला. स्वत:साठी काही मागण्यापेक्षा मी मरणं पसंत करेन असंही ते म्हणाले आहेत.  

‘चला मित्रांनो, आता निरोप घेतो…’

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या लाल परेड मैदानात बुधवारी डॉक्टर मोहन यादव मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीत सहभागी होण्यासाठी पोहोचलेले शिवराज सिंग चौहान यांनी नवे मुख्यमंत्री राज्याला समृद्धी, विकास आणि जनकल्याणच्या नव्या उंचीवर नेतील असा विश्वास व्यक्त केला. पुढे ते म्हणाले की, ‘मोहन यादव यांना शुभेच्छा. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह येत आहेत त्यांचंही स्वागत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचीही स्वागत. चा मित्रांनो आता येतो’.

Related posts