( प्रगत भारत । pragatbharat.com)
नशीब ही एक अशी गोष्ट आहे जी कधी बदलेल काही सांगता येत नाही. कधी एखाद्या नशिबात कायमचा संघर्षच असतो. तर काहींचं नशीब एका रात्री असं काही पालटतं की त्यांनी विचारही केलेला नसतो. काहींच्या यशामागे नशिबासह मेहनतही असते. पण काहींना मिळालेलं यश किंवा पैसा पाहिला तर यामागे फक्त नशीबच असतं. केरळमधील 11 महिलांना तर याचा चांगलाच अनुभव आला आहे. कारण एका रात्रीत या सगळ्या महिला करोपडपती झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या खिशात लॉटरीचं तिकीट खरेदी करण्यासाठी 25 रुपयेही नव्हते.
केरळमध्ये 11 महिलांचं नशीब इतकं पालटलं आहे की, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या सगळ्या महिला एका रात्रीत करोडपती झाल्या आहेत. काही आठवड्यांपूर्वी या महिलांकडे लॉटरीचं तिकीट खरेदी कऱण्यासाठी 250 रुपयेदेखील नव्हते. पण आता त्यांना 10 कोटींची लॉटरी लागली आहे. महिलांनी काही आठवड्यांपूर्वी 250 रुपयांचं तिकीट खरेदी कऱण्यासाठी पैसे गोळा करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांच्या खिशात 25 रुपयेदेखील नव्हते. यामधील एका महिलेने तर इतकी छोटी रक्कम नसल्याने पैसे उधार घेतले होते.
केरळच्या परप्पनंगडी नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या हरित सेनेत या 11 महिला कचरा गोळा करण्याचं काम करतात. आपण करोडपती होऊ असा विचार या महिलांनी स्वप्नातही केला नसेल. बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या ड्रॉनंतर केरळ लॉटरी विभागाने त्यांना 10 कोटींच्या मॉन्सून बंपरचं विजेता घोषित केलं.
आपल्या सहकाऱ्यांकडून पैसे गोळा केल्यानंतर तिकीट खरेदी करणाऱ्या राधाने सांगितलं की, “आम्ही याआधीही पैसे गोळा करत तिकीट खरेदी केलं होतं. पण पहिल्यांदाच आम्हाला इतकी मोठी रक्कम पुरस्कारात मिळाली आहे”. दुसऱ्या महिलेने सांगितलं आहे की, आम्ही फार आतुरतेने या निकालाची वाट पाहत होतो. पण जेव्हा आम्हाला पलक्कड येथे विकण्यात आलेल्या तिकीटाला पहिला पुरस्कार मिळाल्याचं सांगण्यात आलं तेव्हा वाईट वाटलं होतं.
पुढे त्यांनी सांगितलं की “पण जेव्हा आम्हाला जॅकपॉल लागला आहे समजलं तेव्हा आमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आम्ही सर्वजण आयुष्यात अनेक संघर्षांचा सामना करत आहोत. पैसा आल्याने आमच्या या समस्या बऱ्यापैकी कमी होतील”. या महिलांचं वेतन फार कम असून, अनेकजणी कुटुंबातील एकमेक कमावत्या आहेत. अशा स्थितीत हा पैसा त्यांच्यासाठी फार मोठा आधार आहे.
हरिता कर्म सेना घरं आणि आस्थापनांमधून नॉन-बायोडिग्रेडेबल कचरा उचलतात, जो श्रेडिंग युनिट्समध्ये पुनर्वापरासाठी पाठवला जातो. नगरपालिकेतील हरित कर्म सेना संघाच्या अध्यक्षा शीजा म्हणाल्या की, यावेळी नशिबाने सर्वाधिक पात्र महिलांना साथ दिली. सर्व विजेत्या खूप मेहनती आहेत आणि त्यांच्या कुटुंबासाठी उत्पन्नाचे एकमेव साधन आहेत.
त्यांनी पुढे सांगितलं की, “अनेकांना आपलं कर्ज फेडायचं आहे. मुलींचं लग्न करायचं आहे. तसंच काहींना वैद्यकीय खर्च आहेत. आयुष्याचा संघर्ष सुरु असून फार साध्या घरात त्या राहतात”. दरम्यान महिलांनी जॅकपॉट जिंकल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी घराबाहेर गर्दी केली होती.