…अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट फ्रान्सहून अमित शाह यांना फोन, केली चौकशी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Narendra Modi calls Amit Shah: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या फ्रान्सच्या (France) दौऱ्यावर आहेत. दरम्यान, दुसरीकडे राजधानी दिल्लीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. यामुळे नरेंद्र मोदींनी थेट फ्रान्समधून फोन करुन अमित शाह (Amit Shah) यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. फोनवरुन झालेल्या या चर्चेदरम्यान, अमित शाह यांनी नरेंद्र मोदींना नेमकी सध्या काय स्थिती आहे याची माहिती दिली. तसंच यमुना नदीचं पाणी पुढील 24 तासात ओसरण्यास सुरुवात होईल असं सांगितलं. 

केंद्रीय गृहमंत्रालयाने ट्वीट करत याची माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये त्यांनी सांगितलं आहे की “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली”.

दिल्लीत पाऊस नसतानाही पुराने थैमान का घातलं आहे? पाणी नेमकं येतंय कुठून?

 

“अमित शाह यांनी पुढील 24 तासात पाणी ओसरण्यास सुरुवात होईल आणि परिस्थितीवर नायब राज्यपालांसह मी लक्ष ठेवून आहे अशी माहिती अमित शाह यांनी दिली. पुराच्या पाण्यात अडकलेल्यांच्या मदत आणि बचावकार्यासाठी योग्य प्रमाणात एनडीआरएफ पथकं तैनात करण्यात आली आहे,” अशी माहितीही केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. 

दिल्लीमध्ये पूरसदृश्य परिस्थितीमुळ जनजीवन विस्कळीत झालं असून, लोकांना घरातच थांबावं लागत आहे. यमुना नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने सर्वसामान्य जीवन विस्कळीत झालं आहे. प्रशासनाने 16 जुलैपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच अनावश्यक सेवेतील अवजड वस्तूंच्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. 

गुरुवारी सकाळी 8 वाजता, यमुना नदीतीला पाण्याची पातळी 208.48 मीटर इतकी होती. यानिमित्ताने 1978 मध्ये निर्धारित केलेली 207.49 मीटरची आतापर्यंतची सर्वाधिक पातळी यावेळी ओलांडण्यात आली. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आणि आजुबाजूच्या परिसरात पडलेला मुसळधार पाऊस आणि हरियाणाच्या हथिनीकुंड बॅरेजमधून पाणी सोडण्यात आलं असल्याने राजधानी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पण तज्ज्ञांनी दिल्लीमधील या स्थितीमागे इतर कारणंही असल्याचं सांगितलं आहे. अतिक्रमण आणि गाळ ही यामागील मुख्य कारणं आहेत असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दरम्यान, दिल्लीतील स्थिती आणखी खराब होण्याची भीती असल्याने प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. एनडीआरएफची 12 पथकं सध्या बचावकार्यासाठी मैदानात कार्यरत आहे. 

Related posts