HDFC Bank Viral Video: “टार्गेट पूर्ण का केले नाही”, HDFC च्या सीनिअरकडून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ: VIDEO कॉल व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

HDFC Bank Officer Abuse Video: कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांवर टार्गेटसाठी असणारा दबाव तसा सर्वश्रुत आहे. पण घऱाचे हप्ते, मुलांचं शिक्षण, आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी हे टार्गेट पूर्ण करा अन्यथा दुसरी नोकरी शोधा याशिवाय इतर कोणताही पर्याय नसल्याने कर्मचारी मुकाट्याने हा बुक्यांचा मार सहन करत असतात. अशावेळी अनेकदा वरिष्ठांकडून होणारा मानसिक त्रास हा मर्यादेच्या पलीकडचा असतो. पण त्याला वाच्यता फोडली तर नोकरी जाईल या भीतीने कोणीही त्यावर भाष्य करत नाही. दरम्यान, वरिष्ठांना होणारा हा जाच कशाप्रकारचा असतो हे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. 
 
सोशल मीडियावर (Social Media) एचडीएफसी बँकेचा (HDFC Bank) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कंपनीच्या अंतर्गत बैठकीत बँकेचा वरिष्ठ कर्मचारी आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत असून अर्वोच्च भाषेत बोलत असल्याचं या व्हिडीओ कॉल मीटिंगमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर बँकेने आपल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उचलत त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. 

हा व्हिडीओ कोलकातामधील असून वरिष्ठ कर्मचारी बंगाली भाषेत बोलताना ऐकू येत आहे. बँकेची उत्पादनं आणि विमा योजना विकण्यात असमर्थ राहिल्याने हा कर्मचारी आपल्या कनिष्ठांवर ओरडत होता. पण यावेळी त्याने पातळी ओलांडत अर्वोच्च भाषेचा वापर केला. 

“गेल्या दिन दिवसांत तुम्ही किती बचत आणि चालू खाती उघडली आहेत? मला सांगा,” असं हा निलंबित कर्मचारी आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना ओरडत विचारत होता. यावेळी तो सतत त्यांच्यावर ओरडत होता. नंतर त्याने एका कर्मचाऱ्याला, तू 15 खाती सुरु करणं अपेक्षित होतं पण 5 केलीस असं सांगत आरडाओरड केली. 

हा व्हिडीओ ट्विटरला पोस्ट करण्यात आल्यानंतर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यानंतर बँकेचे सर्व्हिस मॅनेजर अजय यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, संबंधित कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं असून याप्रकरणी सविस्तर तपास सुरु कऱण्यात आला आहे. 

“सोशल मीडियावीर एका व्हिडीओच्या संदर्भातील माहिती आम्ही देत आहोत. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीच्या आधारे, संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे आणि बँकेच्या आचार मार्गदर्शक तत्त्वांनुसार सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनासाठी आम्ही एचडीएफसी बँकेत शून्य-सहिष्णुता धोरण ठेवतो आणि आमच्या सर्व कर्मचार्‍यांना आदराने आणि सन्मानाने वागवण्यावर ठाम विश्वास ठेवतो,” असं सर्व्हिस मॅनेजरने ‘HDFC बँक केअर्स’ च्या हँडलवर लिहिलं आहे.

यादरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी कामाच्या विषारी पद्धतीवर भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. 

“अशा प्रकारची विषारी कामाची संस्कृती भारतात आता सामान्य झाली आहे,” असं एका युजरने म्हटलं आहे. एका युजरने मलाही अशाच त्रासाला सामोरं जावं लागत असून नोकरी सोडण्याचा विचार केला आहे असं सांगितलं आहे. 

निलंबित कर्मचाऱ्याच्या हाताखाली काम केल्याचा दावा करणाऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, “त्याच्या हाताखाली आणि जवळ काम केल्यामुळे हा तोच असून ही त्याची विनम्र बाजूने आहे हे मी सांगू शकतो. अनेकांना हास्यास्पद वाटेल पण ते सत्य आहे”.

Related posts