New Year 2024 : घरबसल्या पाहा महाकाल, सिद्धीविनायक आणि गंगा आरती; नव्या वर्षाची मंगलमय सुरुवात

( प्रगत भारत । pragatbharat.com)

New Year 2024 : डिसेंबर महिन्याचा शेवटचा दिवस उजाडला आणि 31 डिसेंबर या दिवसासह संपूर्ण जगानं 2023 या वर्षाला निरोप देत 2024 या नव्या वर्षाचं स्वागत केलं. घडाळ्यात रात्री 12 वाजल्याचा ठोका पडताच जगातील बहुतांश भागांमध्ये नेत्रदीपक सादरीकरणासह या नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. इथं भारतात नव्या वर्षाच्या निमित्तानं अनेकांनीच या दिवसाची सुरुवात मंगलमयीरित्या करण्याचं ठरवलं. ज्या निमित्तानं देशातील विविध धार्मिक स्थळी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. 

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. लाखो (Shridi) साईभक्त शिर्डीत दाखल झाले. लाखोंच्या संख्येनं आलेल्या भाविकांसाठी रात्रभर साईमंदिर खुलं ठेवण्यात आलं होतं. तर तिथं नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविकांनी नाशिकच्या सप्तशृंग गडावर गर्दी केली. इथंही भाविकांना आदिमायेचं दर्शन मिळावं यासाठी मंदिर 24 तास खुलं ठेवण्यात आलं होतं. 

अनेकांच्या श्रद्धास्थानी असणाऱ्या मुंबईतील (Siddhivinayak temple) श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्येही नव्या वर्षाच्या पहाटे गणरायाची आरती संपन्न झाली. यावेळी इथं भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. तर, उत्तर प्रदेशामध्येसुद्धा वर्षाची पहिली (Ganga arti) गंगा आरती वाराणासीतील दशाश्वमेध घाटावर पार पडली. यावेळी पुरोहितांनी सूर्य पूजाही केल्याचं पाहायला मिळालं. कडाक्याच्या थंडीमध्ये गंगेच्या तीरावर पार पडणारी आरती पाहण्यासाठी यावेळी काही भाविकांनीही हजेरी लावली होती. 

पंजाबमधील अमृतसर येथे असणाऱ्या सुवर्ण मंदिरामध्येही गुरु ग्रंथसाहेबपुढे अनेक भाविक नतमस्तक झाल्याचं पाहायला मिळालं. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये असणाऱ्या महाकालेश्वर मंदिरातही 2024 या वर्षातील पहिलीच भस्मारती संपन्न झालीय या आरतीचे क्षण पाहण्यासाठीसुद्धा बऱ्याच भाविकांनी हजेरी लावली होती. 

नेतेमंडळींनी दिल्या शुभेच्छा… 

इथं देशातील भाविकांनी त्यांच्या त्यांच्या परिनं नव्या वर्षाची सुरुवात केलेली असतानाच तिथं नेतेमंडळींनीही या वर्षाच्या आश्वासक शुभेच्छा नागरिकांना दिल्या. “महाराष्ट्र हे देशाचं ‘ग्रोथ इंजिन’ असून नव्या २०२४ वर्षात हे इंजिन अधिक शक्तिमान, गतिमान करुया. शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, गुंतवणूक अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचं अव्वल स्थान कायम राखूया. जाती, धर्म, भाषा, पंथ, प्रांत, लिंगभेदाच्या भिंती तोडून टाकूया. अज्ञान, अनीती, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-प्रथा-परंपरा नष्ट करुया. सत्यशोधक, पुरोगामी, विज्ञानवादी विचारांचा अंगिकार करुया. आपल्या सर्वांच्या सहभाग, सहकार्य, प्रयत्नांतून मजबूत, प्रगत महाराष्ट्र घडवूया.” असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जनतेला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये त्यांनी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये हजेरी लावल्याचंही पाहायला मिळालं. तर, केंद्रात विरोधी गटाच्या बाकावर असणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर एक सुरेख फोटो शेअर केला. 

Related posts