मुलीच्या हुंड्यात दिलं 11 लाखांचं सोनं, SUV, पण तरीही सासरच्यांनी केली हत्या; फॉर्च्यूनर दिली नाही म्हणून केलं ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ग्रेटर नोएडा येथे हुंड्यासाठी एका महिलेची पती आणि सासरच्यांनी हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्यांनी महिलकडे हुंड्याची मागणी केली होती. त्यांना 21 लाख रोख रुपये आणि टोयोटा फॉर्च्यूनर कार हवी होती. करिश्मा असं या महिलेचं नाव असून, तिच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी पती विकास आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे. 

करिश्माचा भाऊ दीपक याने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सांगितलं आहे की, शुक्रवारी बहिणीने त्याला फोन केला होता. पती विकास आणि त्याच्या आई-वडील, भावांनी मला मारहाण केल्याचं तिने सांगितलं. आम्ही जेव्हा तिला भेटण्यासाठी घऱी पोहोचलो तेव्हा तिचा मृत्यू झाला होता. 

करिश्माने डिसेंबर 2022 मध्ये विकासशी लग्न केलं. ग्रेटर नोएडा येथे करिश्मा आणि विकास कुटुंबासह वास्तव्य करत होते. दीपकने केलेल्या दाव्यानुसार, कुटुंबाने लग्नावेळी सासरच्यांना 11 लाखांचं सोनं आणि एसयुव्ही दिली होती. पण यानंतर विकासचं कुटुंब सतत हुंड्याची मागणी करत होतं. यासाठी ते करिश्माला शारिरीक आणि मानसिक त्रास देत होते. 

करिश्माने मुलीने जन्म दिल्यानंतर हा वाद आणखीनच वाढत गेला होता. दोन्ही कुटुंबांमधील वाद टोकाला पोहोचले होते. विकासच्या गावातील पंचायत बैठकीत हे वाद सोडवण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. करिश्माच्या कुटुंबाने यानंतरही तिच्या सासरच्यांना 10 लाख रुपये दिले होते. पण तरीही छळ थांबला नव्हता असं दीपकचं म्हणणं आहे. 

विकासच्या कुटुंबाने नुकतीच एक नवी मागणी केली होती. यात त्यांनी करिश्माकडे एक फॉर्च्यूनर कार आणि 21 लाखांची रक्कम मागितली होती. ही मागणी पूर्ण न झाल्याने विकासने कुटुंबीयांसह करिश्माला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी याप्रकरणी विकास, त्याचे वडील सोमपाल भाटी, आई, बहिण रिंकी आणि भाऊ सुनील, अनिल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी विकास आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे. 

Related posts