पुरात भलीमोठी दगडं वाहून गेली पण शंकराचं मंदिर जागचं हललं नाही; जाणून घ्या या ‘केदारनाथ’ मंदिराबद्दल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Panchvaktra Temple: हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) सध्या पुराने थैमान घातला आहे. नद्यांना पूर आल्याने सर्वसामान्य जीवन विस्कळीत झालं आहे. पुराच्या पाण्यात अनेक घरं वाहून गेली आहेत. घऱांसह दुकान, इमारतींचंही नुकसान झालं आहे. कुल्लू, मनाली, मंडी सारख्या भागांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. पुराचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधील एका व्हिडीओची मात्र तुफान चर्चा आहे. कारण या व्हिडीओत पुराच्या पाण्यात शंकराचं मंदिर अगदी भक्कमपणे उभं आहे. पुराच्या पाण्यातही जागेवरुन अजिबात न हालणाऱ्या या मंदिराची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

मंडीमधील या ऐतिहासिक पंचवक्त्र मंदिराने कित्येक तास व्यास नदीच्या पुराचा सामना केला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पाच दशकांपेक्षाही जास्त काळापासून हे शिवमंदिर हिमाचल प्रदेशची सुरक्षा करत आहे. 500 वर्ष जुनं हे मंदिर दिसायला अगदी हुबेहूब केदारनाथ मंदिराप्रमाणे आहे. 

मंदिराच्या आजुबाजूच्या परिसराचं नुकसान

मंडी येथील शंकराच्या मंदिराच्या आसपास मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हे नुकसान पुढील अनके वर्षं आठवणीत राहिल असं आहे. पंचवक्त्र म्हणजे महादेवाचे पाच तोंड असणारी मूर्ती. पंचमुखी मंदिराच्या शेजारी निसर्गाने फार मोठी हानी केली आहे. मंडी शहराला या मंदिराशी जोडणारा लोखंडाचा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. यामुळे मंदिरात जाण्यास इच्छुक असणाऱ्या भाविकांसाठी आता शहराच्या मधून जाणारा एकमेव रस्ता पर्याय आहे. पण सध्याचा धोका पाहता भाविकांना ती परवानगी नाही. 

स्थानिक पुजारी नवीन कौशिक यांच्या माहितीनुसार, हे मंदिर 16 व्या शतकात राजाने बांधलं होतं. दरम्यान, हे मंदिर पांडवांनी बांधल्याचाही दावा आहे. जिथे स्वत: पांडवांनी पूजा केली होती. 

सध्या मंदिराच्या परिसरात पुरातून वाहून आलेली माती आणि मलबा साचला आहे. पण मंदिराचं मात्र कोणत्याही प्रकारे नुकसान झालेलं नाही. 

श्रावणी सोमवार असल्याने मंदिरात भक्तांची गर्दी होणार होती. पण रविवारीच नैसर्गिक संकट आलं आणि लोकांना आपल्या घऱात थांबावं लागलं. आता मंदिराच्या आसपास फक्त पुराच्या खूणा आहेत. मंदिराच्या प्रवेशाच्या ठिकाणी बाबा भैरवनाथाचं मंदिर आहे. याला मंदिराचं रक्षक मानलं जातं. भैरवनाथाचं हे मंदिर मातीत बुडालं आहे. तसंच मूर्तीही रेतीखाली लपली आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजावर 3 ते 4 फुटांचा मलबा आहे. तसंच मंदिराच्या बाजूलाही मलबा असल्याने परिक्रमा करणंही शक्य नाही. 

प्रशासन लवकरच मंदिर पूर्वस्थितीवर आणेल असा विश्वास स्थानिक व्यक्त करत आहेत. पण सध्या महादेवाची मूर्ती मातीखाली दबली असून, दर्शन घेणं शक्य होत नाही आहे. दरम्यान, या मंदिरामुळे कमीत कमी नुकसान झालं असं स्थानिक सांगत आहेत. 

Related posts