Indian Railway : ट्रेनमध्ये वाद झाल्यास RPF नव्हे, ‘इथं’ करायची तक्रार; कायम लक्षात ठेवा आणि योग्य मदत मिळवा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indian Railway helpline : भारतामध्ये रेल्वेला एक मोठा इतिहास आहे. अशा या रेल्वे विभागामध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं काही महत्त्वपूर्ण बदल करत प्रवाशांच्या दृष्टीनं रेल्वे प्रवास सुकर करण्यावर प्रशासन भर देताना दिसलं आहे. रेल्वेकडून प्रवाशांना अनेक सुविधाही पुरवल्या जात आहेत. यातलीच एक सुविधा म्हणजे त्यांना चालू प्रवासादरम्यान मिळणारी मदत. 

रेल्वे प्रवासात अनेकदा काही अडचणी उदभवतात. काही वादाचे प्रसंगही उभे राहतात. अनेकदा तर ही प्रकरणं बाचाबाची आणि हाणामारीपर्यंत जातात. अशा वेळी नेमकं काय करावं? तक्रार कुठे करावी हेच अनेकांना लक्षात येत नाही. सरतेशेवटी धाव घेतली जाते ती म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अर्थात आरपीएफकडे. पण, तसं नाहीये. 

रेल्वे प्रवासात वाद, भांडण झाल्यास कुठे कराल तक्रार? 

रेल्वे प्रवासादरम्यान भांडणाची परिस्थिती उदभवल्यास तुम्ही GRP शी संपर्क साधणं अपेक्षित असतं. या प्रकरणी डोकावत त्यावर मदत पुरवण्याचा अधिकार जीआरपी म्हणजेच गव्हर्न्मेंट रेल्वे पोलिसांकडे आहे. पोलिसांच्या या विभागाकडून रेल्वे परिसर, रेल्वे प्रवासादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष ठेवलं जातं. रेल्वे परिसरामध्ये गस्त घालण्याचं कामही याच विभागाचं असून, या परिसरात आक्षेपार्ह कृत्य करताना कोणीही आढळल्यास त्यांना अटक करण्याचे अधिकारही याच पोलीस दलाकडे आहेत. त्यामुळं रेल्वेमध्ये किंवा रेल्वे परिसरात कोणाशी वाद झाल्यास जीआरपीकडे तक्रार करा. 

RPF चं काम काय? 

राहिला मुद्दा आरपीएफचा, तर रेल्वे संपत्तीला संरक्षण पुरवणं हे या दलाचं मुख्य काम आहे. महिलांसाठीच्या राखीव डब्यांमध्ये इतरांना प्रवेश नाकारणं, बेकायदेशीर प्रवेश रोखणं, रेल्वेतील गैरप्रकार रोखणं, दलाली किंवा इतर गैरप्रकारांसंदर्भातील तक्रारींचं निवारण आरपीएफकडून केलं जातं. 

रेल्वे प्रवासादरम्यान, अनेकदा अडचणीची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर नेमकी कोणाकडे मदत मागायची आणि ती मदत नेमकी कशी मिळवायची हेच माहित नसल्यामुळे अनेकदा प्रवासी या मदतीपासून वंचित राहतात. पण, इथून पुढं तसं होऊन देऊ नका. 

 

Related posts