( प्रगत भारत । pragatbharat.com)
Twitter Founder Jack Dorsey: भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त वेळ चाललेल्या शेतकरी आंदोलनाने (Farmers Protest) जगभर भारताची नाचक्की झाल्याचं दिसलं होतं. कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकला होता. कंत्राटी शेतीच्या मुद्द्यावर मोठा आक्षेप घेत शेतकऱ्यांनी आवाज उठवला आणि अखेर मोदी सरकारला झुकती भूमिका घ्यावी लागली. सोशल मीडियावरून अनेकांनी यावर आवाज उठवला होता. अशातच आता ट्विटरचे माजी सीईओ आणि फाऊंडर जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी खळबळजनक दावा केला आहे.
मोदी सरकारने (Modi government) शेतकरी आंदोलनादरम्यान धमकी दिल्याचा दावा जॅक डोर्सी यांनी केला आहे. सरकारवर टीका करणाऱ्यांना रोखण्यासाठी मोदी सरकारचा आमच्यावर दबाव होता, असं देखील जॅक डोर्सी यांनी म्हटलंय. त्यांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय. नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने हा व्हिडिओ शेअर (Viral Video) केलाय. त्यानंतर सर्वत्र खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
काय म्हणाले जॅक डोर्सी?
भारतात ज्यावेळी शेतकरी आंदोलन सुरू होतं. त्यावेळी सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांसह इतर विरोधकांचे ट्विटर (Twitter) हँडल ब्लॉक करण्यासाठी अनेक शिफारसी आमच्याकडे करण्यात आल्या होत्या. भारतातील ट्विटर बंद करू किंवा तुमच्या अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकू अशा धमक्या आम्हाला दिल्या जात होत्या. नियम न पाळल्यास ट्विटरचे कार्यालय सुद्धा बंद करू अशी धमकी सुद्धा दिली होती, असा गौप्यस्फोट जॅक डोर्सी यांनी केला आहे. मुलाखतीदरम्यान, परदेशी सरकारांच्या दबावाचा सामना करावा लागला आहे का?, असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे.
पाहा Video
Mother of Democracy – Unfiltered
“During farmer protest, Modi govt pressurized us and said we will shut down your offices, raid your employees’ homes, which they did if you don’t follow suit.”
– Jack Dorsey, former Twitter CEO pic.twitter.com/tOyCfyDWcz
— Srinivas BV (@srinivasiyc) June 12, 2023
दरम्यान, भारताप्रमाणेच तुर्कस्तानने देखील ट्विटरला धमकी दिल्याचा दावा जॅक डोर्सी यांनी केला आहे. आम्ही त्यांच्याविरुद्ध अनेक खटले लढले आणि जिंकले देखील आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये केंद्र सरकारने (Indian Government) तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. मात्र, या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांना देखील त्रास सहन करावा लागला. तर काही शेतकऱ्यांचे मृत्यू देखील झाल्याचं पहायला मिळालं होतं.