( प्रगत भारत । pragatbharat.com)
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील एका पतीने आपल्या पत्नीच्या हत्येसाठी 6 लाखांची सुपारी दिली होती. पण मारेकरी पत्नीची हत्या करु शकले नाहीत. आपण काम पूर्ण न केल्यास पैसे परत करावे लागतील हे त्यांना माहिती होतं. यादरम्यान त्यांच्या मनात हाव निर्माण झाली आणि त्यांनी सुपारी देणाऱ्याचीच हत्या करण्याची योजना आखली. कारण असं केल्याने त्यांना सुपारीचे पैसे परत करावे लागणार नव्हते. यानंतर त्यांनी संधी साधत सुपारी देणाऱ्या पतीचीच गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी या हत्याकांड प्रकरणी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
बुलंदशहरच्या ककोड ठाणे क्षेत्रीत ही घटना घडली आहे. येथे 15 नोव्हेंबरला प्रॉपर्टी डीलर तेजपालची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पोलीस या हत्याकांडाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करत होते. बरेच दिवस पोलिसांना काही सुगावा लागत नव्हता. यादरम्यान पोलिसांच्या हाती गोळ्या झाडणारे शूटर्स लागले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता हत्येप्रकरणी काही धक्कादायक खुलासे झाले.
पोलिसांनी सांगितलं आहे की, सुपारी घेणाऱ्यांनीच ही हत्या केली. अटक करण्यात आलेला शूटर बलराजला मृत तेजपालने आपल्या पत्नीच्या हत्येसाठी 6 लाख 20 हजारांची सुपारी दिली होती. पत्नी आपल्या हत्येचा कट आखत असल्याचा त्याला संशय होता. पण शूटर बलराज आणि त्याचा सहकारी दीप सिंह तेजपाल पत्नीची हत्या करण्यात असमर्थ ठरत होते. कारण ती नेहमी सीसीटीव्हीच्या छायेत होती.
अशा स्थितीत त्यांनी तेजपाललाच रस्त्यातून हटवण्याचा कट आखला, जेणेकरुन सुपारीसाठी दिलेले पैसे परत करावे लागणार नाहीत. यानंतर 15 नोव्हेंबरला बलराज आणी दीप या सुपारी किलर्सने तेजपालची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी बलराज आणि दीपला बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 3 लाख रुपये, एक पिस्तूल आण काडतूसं जप्त करण्यात आली आहेत.
पोलीस अधिक्षकांनी याप्रकरणी सांगितलं आहे की, तेजपालचा मृतदेह त्याच्याच घरात आढळला होता. त्याच्या पत्नीने अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
सीसीटीव्हीने पत्नीला वाचवलं
पोलिसांनुसार, बलराज आणि दीप यांनी चौकशीत सांगितलं की, तेजपालला पत्नी आपली हत्या करेल अशी भीती होती. यामुळेच त्याने पत्नीच्या हत्येचा कट आखला. तसंच हत्येसाठी 6 लाखांची सुपारी दिली. पण तेजपालची पत्नी जिथे राहत होती तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. आपण पकडले जाऊ या भीतीपोटी बलराज आणि दीप हत्या करु शकले नाहीत. सुपारीचे पैसे परत द्यावे लागू नयेत यासाठीच त्यांनी तेजपालची गोळ्या घालून हत्या केली.